बुलढाणा : मैत्री दिनाच्या निमित्तानं बुलढाण्यात आयोजित एका खास कार्यक्रमात एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. कार्यक्रमात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी "मुसाफिर हूँ यारों, ना घर है ना ठिकाना" हे गाणं आपल्या सुरेल आवाजात सादर करत उपस्थितांचं मन जिंकलं.गेल्या दोन महिन्यांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर निलेश तांबे यांनी अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार कारवाई केली. गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळून कायद्याचा धाक निर्माण करत त्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम केली आहे. मात्र, या कडक अधिकाऱ्याच्या वर्दीच्या आड दडलेलं एक हळवं, कलावंत मन नुकतंच या मैत्री दिनाच्या कार्यक्रमात दिसून आलं. कार्यक्रमाच्या दरम्यान, उपस्थितांच्या आग्रहास्तव त्यांनी गायलेलं हे गीत उपस्थित श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेलं. त्यांचा आवाज, गायकीची जाण आणि भावना व्यक्त करण्याची शैली यामुळे वातावरण भारावून गेलं होतं. हा हृदयस्पर्शी क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, बुलढाणेकरांसाठी हा एक वेगळाच अनुभव ठरत आहे.