जळगाव : शिकण्याची जिद्द आणि कठीण परिस्थितीतही हार न मानणाऱ्या विद्यार्थिनींच्या यशकथा नेहमीच प्रेरणादायी ठरतात. जळगावातील प.न. लुंकड कन्या शाळेची विद्यार्थिनी स्वाती रविंद्र मैराळे हिनं दहावीच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवून आपल्या कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान वाढवला आहे. स्वातीचं यश जितकं मोठं आहे, तितकाच भावनिक आहे, तो तिचा संघर्ष. कारण, परीक्षेच्या काळातच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे रविंद्र मैराळे कुटुंबाचा आधार होते. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या आघातानं स्वातीला खचवलं नाही. स्वातीनं मोठ्या हिमतीनं परीक्षेला सामोरे जात आपली जिद्द दाखवली. पुढे CA बनण्याची इच्छा : "वडिलांनी नेहमी मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं होतं. त्यांच्या आठवणी आणि आईचं पाठबळ यामुळंच मी हे यश मिळवू शकले," असं स्वाती सांगते. तर स्वातीची आई सरिता मैराळे यांनी मोठ्या धैर्याने परिस्थितीला सामोरे जात मुलीला मानसिक आधार दिला. "स्वाती अभ्यासात लक्ष द्यावं, यासाठी मी सतत तिला प्रोत्साहन दिले. नवऱ्याच्या जाण्यानंतरही आम्ही खचून न जाता एकमेकांना सावरलं," असं त्या म्हणाल्या. स्वातीला पुढे वाणिज्य शाखेत उच्च शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनण्याची इच्छा आहे. तिच्या या यशाबद्दल शाळा, नातेवाईक आणि समाजातून तिचं मोठं कौतुक केलं जात आहे.