रायगड : जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील मांडवकर कोंड गावात बिबट्यांच्या जोडीनं थैमान घातल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. गावातील मुख्य रस्त्यावरच या बिबट्यांची जोडी सुमारे चार ते पाच तास होती, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. बिबट्यांच्या दर्शनामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळकरी मुलं, शेतकरी आणि महिलांना बाहेर पडणंही कठीण झालं आहे. याबाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फटाके, गाड्यांचे हॉर्न यांचा वापर करून बिबट्यांना त्या भागातून दूर पळवून लावण्याचा प्रयत्न केला. यामुळं काही अंशी दिलासा मिळाला असला तरी बिबटे परत येतील या भीतीनं नागरिक धास्तावले आहेत. वन विभागानं परिसरात गस्त वाढवली असून, कॅमेरे बसवून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम सुरू केलं आहे. "ग्रामस्थांनी रात्रीच्यावेळी एकट्यानं घराबाहेर पडू नये, शक्यतो जमावानेच हालचाल करावी आणि बिबट्याची हालचाल दिसल्यास तत्काळ प्रशासनाला कळवावं," असं आवाहन वन विभागानं केलं आहे.