पुणे : बाळासाहेब ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांच्यानंतर राज ठाकरे हे आवडीनं व्यंगचित्र काढतात. राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना लहान असताना व्यंगचित्र शिकण्याचा सल्ला दिला होता. परंतु, अमित ठाकरेंनी व्यंगचित्र कला शिकली नाही. याबद्दल कार्यक्रमात बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, "आज मला वाईट वाटतं की, माझ्या वडिलांनी मला दिलेला सल्ला ऐकला असता तर, माझंदेखील एक व्यंगचित्र इथ दिसलं असतं. त्यांनी मला सल्ला दिला होता की, काहीही कर पण दिवसातून एक चित्र काढत जा. पण मी तो ऐकला नाही." मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीनं आयोजित बोलक्या रेषा व्यंगचित्र प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला अमित ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. "व्यंगचित्रची कला ही तुम्हाला कोणी शिकू देत नाही, ही कला तुमच्या आत असते किंवा नसते. माझ्या अनेक मित्रांनी व्यंगचित्र शिकायचा प्रयत्न केला. पण, त्यांना ते जमलं नाही. आज व्यंगचित्र पाहून आनंद झाला. तुमची कला घालवू नका. मला माझ्या वडिलांनी जो सल्ला दिला, तोच मी तुम्हाला देईल की, आयुष्यात व्यस्त झाला तरी एक तास व्यंगचित्राला द्या."