पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरमध्ये रविवारी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. परंपरेनुसार वारकऱ्यांनाही शासकीय महापूजेचा मान मिळतो. यंदाचा मान कैलास दामु उगले आणि कल्पना कैलास उगले शेतकरी दाम्पत्याला मिळाला. "हे सर्व विठुरायाच्या आशीर्वादानं घडवून आलं" अशी भावना उगले कुटुंबीयांनी शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर व्यक्त केली. तब्बल 15 तास हे पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये उभे होते. शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर उगले कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. कैलास उगले हे भावनिक झाले होते. कल्पना उगले यांच्या मनात यंदा शासकीय महापूजेचा मान मिळावा अशी तीव्र इच्छा होती. त्यांची ही इच्छा आज फलद्रूप झाली. "शेतातील पीक चांगले येऊ दे," असं साकडं त्यांनी विठ्ठलाला घातलं.