पुणे- राज्यात सध्या अनेक भागात उन्हाचा चटका वाढत आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे वनातील नैसर्गिक जलस्रोत लवकर आटल्याने डोंगर दर्यातील वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. वन्यजीव पाण्याच्या शोधात वाड्या वस्तीलगतच्या असलेल्या शेतात अन् मानवी वस्तीत येऊ लागलेत. अशात पशू-पक्षी आपला घसा ओला करण्यासाठी धडपडताना दिसताहेत. असं असताना स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानच्या वतीने राजगड तालुक्यातील कादवे गावाच्या तळमाळावर पक्षी प्राण्यांसाठी मानवनिर्मित पाणवठ्यांची सोय करण्यात आलीय. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वनपरिक्षेत्र राजगड (उप वनविभाग भोर) हद्दीत कादवे गावाच्या जंगलात जागोजागी करण्यात आली असून, खड्डे घेऊन त्यामधे प्लॅस्टिक कागद वापरुन पाण्याची सोय करण्यात आलीय. अशा पद्धतीनं मुक्या जीवांची तृष्णा भागवली जात आहे. गावापासून दूर जंगलात 25 ते 30 लिटर पाणी डोक्यावर घेऊन जाऊन असे पाणवठे तयार केले गेलेत. वन्यजीव वाचवा, पर्यावरण वाचवा हा सामाजिक संदेश सदैव या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलाय.