नांदेड : विदर्भ-मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे. निसर्गनिर्मित धबधबा डोळ्यात साठवून ठेवणं ही पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. धबधबा प्रवाहित झाल्यानं निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे. धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. धबधब्याजवळ पोलीस बंदोबस्त नसल्यानं काही हौशी पर्यटक सुरक्षा कठडा ओलांडून नदी पात्रात सेल्फी काढण्यासाठी स्टंटबाजी करतात. त्यामुळं सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळं अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पर्यटकांची गरज लक्ष देऊन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी पावलं उचलावीत आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी इथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त लावावा. धबधबा आणि नदीपात्र परिसरात जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा गार्ड नेमावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.