अहिल्यानगर : जिल्ह्यातील आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक असलेले शनी शिंगणापूर देवस्थान गेल्या काही दिवसांत वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या वादावर आता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.शनी शिंगणापूर देवस्थानचं पावित्र्य तेथील विश्वस्त मंडळामुळे धोक्यात आलं आहे. हिंदू संघटनांच्या भावना समजून घेऊन त्याच भावना माझ्याही आहेत. काही मंडळी हेतुपुरस्सर गैरसमज पसरवत जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं पालकमंत्री विखे पाटील म्हणाले. शनिवारी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, सागर बेग व तुषार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मरक्षण मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.शनैश्वर देवस्थान विश्वस्तांची रविवारी झालेल्या बैठकीत नियमित गैरहजर राहणारे 99 कर्मचारी निलंबित करण्यात आले तर शुक्रवारी झालेल्या बैठकीत 68 कर्मचारी गैरहजर, कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणामुळे काढण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी के दरंदले यांनी सांगितले. गैरहजर व गैरवर्तन केल्यास कर्मचारी काढून टाकण्याचा अधिकार विश्वस्त मंडळास असल्याने हा निर्णय घेण्यात आला, असे विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी सांगितले.