नागपूर : नागपूरकरांनी आज आकाशात अद्भुत दृश्य अनुभवला आहे. ढगांच्या आडून डोकावणाऱ्या सूर्याच्या अवती- भवती वर्तुळाकार इंद्रधनुष्याचं रिंगण तयार झालं होतं. खगोलशास्त्रात संपूर्ण सूर्याभोवती तयार होणाऱ्या वर्तुळाकार इंद्रधनुषी तेजस्वी कड्यास खळे (Solar halo) असे म्हणतात. क्षितिजावर दिसत असलेले हे अर्धे दिसतं. मात्र, सूर्य डोक्यावर असताना ते पूर्ण इंद्रधनुष्य दिसतं. हे पूर्ण इंद्रधनुष्य या खळ्यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती अंदाजे २२ सेमी त्रिज्येचे वर्तुळाकार कडे दिसतात. जे आकाशातील हिमकणांमुळं तयार होतात. हिमकणावर सूर्याची किरणे विकेंद्रित आणि परावर्तित होऊन हे खळे दिसतात. सूर्याचे किरण आकाशातील हिमकणांवर पडतात, तेव्हा ते वाकतात आणि त्यांच्यामुळं सूर्याभोवती खळे दिसतात. २२ सेमीच्या खळ्याव्यतिरिक्त, इतर प्रकारचे खळे देखील दिसू शकतात. जे आकाशातील हिमकणांच्या आकारावर अवलंबून असतात. खळे हे काही विशिष्ट हवामानाचे संकेत असू शकतात. जसं की, गारपटीची शक्यता किंवा थंड हवामान. खळ्यांचे महत्त्व हेच की खळे हे निसर्गाचे एक अद्भुत आणि सुंदर दृश्य आहे. जे अनेकजणांना आकर्षित करते, अशी माहिती खगोल अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली.