छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत अद्याप कुठलीही चर्चा नाही, जेव्हा विचार होईल त्यावेळी भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींसोबत देखील चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सत्तेत युतीधर्माचं पालन करावं लागतं. ज्यांच्यासोबत विचारविनिमय करून वेगळा मार्ग निवडला त्यांच्याशी चर्चा करावी हे स्वाभाविक आहे, असं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा सर्वांचीच आहे. राजकारणात भावनांपेक्षा वास्तविकतेला महत्त्व असतं. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहे. लोकसभेत म्हणावे तसं यश मिळालं नाही तरी विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं. त्यानंतर आता येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून लढायची आहे अशी चर्चा सुरू आहे. सतीश चव्हाण यांनी वेगळं लढण्याबाबत वक्तव्य केलं, मात्र त्यांनी कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली. प्रत्येक जिल्हा आणि तालुका निहाय बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकांमध्ये स्थानिक पातळीवर असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. महायुतीमधील घटकपक्षांशी तशी चर्चा केल्यावर युतीबाबत निर्णय होईल, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.