सातारा : महाबळेश्वरमधील महापर्यटन महोत्सवाच्या समारोपा दिवशी (रविवारी) देश विदेशातील पर्यटकांनी प्रसिध्द वेण्णा लेकवर ३५० ड्रोन्सचा नयनरम्य शो अनुभवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ड्रोन शोचं उद्घाटन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, नितीन पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले उपस्थित होते. महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सवाचं अत्यंत देखणं आयोजन करण्यात आलं. भविष्यातही विविध ठिकाणी पर्यटन महोत्सव आयोजित केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, ड्रोनच्या माध्यमातून आकाशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, प्रतापगड, स्ट्रॉबेरी, तुतारी आणि ढोल वाजवणारा माणूस, लावणी नृत्यांगणा तसंच मंदिरासह विविध कलाकृती सादर करण्यात आल्या. या ड्रोन शोनं पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.