पुणे : दौंड तालुक्यातील पाटस गावामध्ये शेतकऱ्यानं दूधाच्या दरवाढीसाठी चक्री उपोषण सुरू केलं आहे. मागील सात दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. गाईच्या दूधाला 45 रूपये आणि म्हशीच्या दूधाला 65 रूपये दर मिळावा, अशी शेतकऱ्याची मागणी आहे. पाटस गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ चक्री उपोषण सुरू आहे. मात्र, सरकारनं अद्याप या उपोषणाची दखल घेतलेली नाही. याबाबत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यातून त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्याशी संवाद साधण्याची विनंती केली आहे. तसंच दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणारा त्रास, दुधाचा उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यातील तफावत लक्षात घेता दुधाला वाढीव दर देण्याचा निर्णय शासनानं घ्यावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.