बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भरोसा गावात एका शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार भरोसा गावात पोहोचले होते. यावेळी गावातीलच आठवीत शिकणाऱ्या सीमा गजानन थुट्टे या मुलीनं रोहित पवारांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा अत्यंत परखडपणानं मांडल्या. यावेळी रोहित पवारांनीही तिच्या संपूर्ण वेदना ऐकून घेतल्या. यावेळी सीमानं सांगितलं की, "शेतकऱ्याच्या घरात कधी मीठ असतं, तर तेल नसतं; तेल असतं तर मीठ नसतं." हे शब्द उच्चारताना तिच्या डोळ्यांतील वेदना स्पष्ट दिसत होत्या. याचवेळी तिनं सरकारला उद्देशून थेट प्रश्न उपस्थित केला, "सरकारला शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच जाग येणार का?" तिच्या या भावनिक उद्गारानं उपस्थितांची मनं हेलावली. सीमाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी तिच्या धैर्याचं आणि संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे. यावेळी आमदार रोहित पवारांनी या भेटीत ग्रामस्थांना आधार देण्याचा प्रयत्न केला.