पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोनं (UNESCO) जागतिक वारसा नामांकन यादीत समावेश केला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्याला हे यश मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आणि त्यांचं सहकार्य महत्वाचं ठरल्याचं सांगून त्यांचे अजित पवारांनी विशेष आभार मानले. तसेच, महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्या तमाम महाराष्ट्रवासियांचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक क्षणांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच त्यांनी विरोधकांना टोलादेखील लगावला आहे. "महाराज जाऊन जवळपास 395 वर्षे झाली असली, तरी त्यांच्या विचारांचं आणि वास्तूंचं जतन पुढच्या पिढ्यांसाठी होणं गरजेचं आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समावेश महत्त्वाचा होता,” असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.