शरद पवारांना यासाठी आमदार भेटतात : चंद्रकांत पाटील
  • 3 years ago
भारतीय जनता पक्षाचा कोणीही आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात नाही. या सरकारकडून एवढी खुन्नस काढली जात आहे की आमदारांच्या मतदारसंघातील विकासाची कामेही होत नाहीत. म्हणून ते आमदार शरद पवार यांना भेटतात. विकास काम मार्गी लावण्यासाठी पवारांकडे आग्रह धरावा लागतो. याचा अर्थ भाजपचे आमदार तिकडे चालले, असा होत नाही, असे स्पष्टीकरण भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप आमदारांच्या पक्षांतराच्या बातम्याबाबत दिले. पाटील यांनी आज (ता. 10 ऑगस्ट) पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. पुणे शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना पुण्यात जंबो हॉस्पिटलची आवश्‍यकता काय? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. शहरात तीन तीन हॉस्पिटल आणि तीनशे कोटी का खर्च करताय. मुंबईतील हॉस्पिटल रिकामी आहेत. ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड आत्ता पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, असेही पाटील म्हणाले. 'भाजपच्या 105 आमदारांमधील 80 जणांना तिकडं जावं लागेल, ते एवढं सोपं आहे का?' असा प्रश्‍नही पाटील यांनी आमदारांबाबत उठत असलेल्या वावड्यावर उपस्थित केला.
Recommended