शिर्डी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूजय विखे पाटलांवर टीका केली. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरातांनी यांनी "मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो, आम्ही एका वयाचे आहोत. सुजय विखेंवर काय बोलायचं? आम्हाला पोरा-बाळांवर चर्चा करायला लावू नका. पोरा-बाळांना सांगायचं आहे, काळ खूप मोठा आहे, काळजीपूर्वक जा", असा सल्लाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी खासदार सुजय विखेंना दिला होता. थोरातांच्या या वक्तव्यावर सुजय विखेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "बाळासाहेब थोरात साहेब मोठे नेते आहेत. त्यांना सल्ला देण्याचा अधिकार आहे. पण हीच भूमिका त्यांनी विधानसभा निवडणुकीत घ्यायला हवी होती. तेव्हा मात्र प्रत्येक भाषणात त्यांनी माझ्यावर टीका केली. अमोल खताळ यांना खबरी म्हटलं. मला पळवून लावल्याचं सांगितलं. मी काट्यात लपल्याचंही म्हटलं. तेव्हा आम्ही पोरं-बाळं नव्हतो का? आता पराभवानंतर मात्र आम्ही पोरं-बाळं झालो का. आम्ही तुमचा सन्मान करतो. पण तुम्ही आम्हाला पोरं-बाळं म्हणण्याची चूक केली आणि याच पोरा-बाळांनी तुमचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला," अशी खोचक टीका यावेळी सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांवर केली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता विखे-थोरात या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगत असून विखेंच्या या टोल्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.