बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे केलेल्या हत्येचे प्रकरण अजून निकाली निघाले नाही, तोच बीड जिल्ह्यात जीवे मारण्याचे प्रयत्न आणि हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, परळीमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने जबर मारहाण करत त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. यावर आता सुरेश धस यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "परळीमध्येच असे प्रकार घडत आहेत. मारहाण करण्याची बोलण्याची जी पद्धत आहे, ती संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं मारहाण करण्यात आली तशीच आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. परंतु, पुण्यातील बोरसे प्रकरणात जशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन कारवाई करण्यात आली, तशीच या प्रकरणातील आरोपीवर कारवाई केली पाहिजे. दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपीचे वाल्मीक कराडसोबत फोटो आहेत. त्यांनी गावोगाव अशी पोरं तयार केली आहेत. हे सगळं एवढ्या लवकर थांबणार नाही," असं सुरेश धस म्हणाले.