नवी मुंबई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'स्व. दि. बा. पाटील' यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. पनवेल महानगरपालिकेनं शहरातील साइन बोर्डवर 'नवी मुंबई विमानतळ' असं नाव लिहलेलं पाहून मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या फलकांवर 'स्व. दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' (D B Patil International Airport) असं नाव नसल्यामुळे मनसेनं आंदोलनाचा मार्ग अवलंबला.मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या 'नवी मुंबई विमानतळ' लिहिलेल्या फलकांना काळा रंग फासून निषेध नोंदवला. 'आम्ही फक्त बोलत नाही, करून दाखवतो', असं म्हणत मनसेनं संघर्ष अखेरच्या टप्प्यापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार केला. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वानं स्पष्ट केलं की, पनवेल आणि परिसरातील जनतेच्या भावना या मागणीशी जोडलेल्या आहेत, आणि हा संघर्ष तोपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव दिलं जात नाही.