राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असा धमकीचा कॉल आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. आरोपीने सोमवारी (१० एप्रिल) रात्री ११२ या हेल्पलाईनवर फोन करून धमकी दिली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे आरोपी म्हणाला आणि त्याने फोन बंद केला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले. राजेश मारूती आगवने (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे. राजेश हा मुंबईतील धारावी परिसरात राहतो. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी आरोपी दारुच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले.