बंगले, इमारती, फ्लॅट; सोमय्यांचे ठाकरेंवर जिव्हारी लागणारे वार

  • 2 years ago
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या अलिबागमधील कथित बंगल्यांबाबत आरोप करुन खळबळ माजवली, त्यानंतर काही दिवसातच शिवसेनेचेच नेते यशवंत जाधव यांच्यावरही आयकरच्या धाडी पडल्या, त्यांनी कोट्यवधींची मालमत्ता अल्पवधीत खरेदी केल्याचं सोमय्यांनी थेट सांगितलं. काही दिवस जात नाहीत तोवरच आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काहीसं टेंशन वाढवणारी कारवाई ईडीने केली ती म्हणजे रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर यांचे ११ फ्लॅट जप्त करण्यात आलेत. सोमय्यांनी आधी ठाकरेंचे बंगले काढले, त्यानंतर शिवसेना नेत्याची मालमत्ता काढली आणि आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याचीच मालमत्ता जप्त करण्यात आलीय. सोमय्यांनी दोन अशी नावं घेतली आणि कारवाई करायला भाग पाडलं, ज्याचा संबंध थेट ठाकरे कुटुंबाशी आहे. ही दोन नावं कोण आहेत, सोमय्यांनी कुणाकुणाची संपत्ती काढलीय आणि पुढचा नंबर नेमका कुणाचा आहे हे सविस्तर या व्हिडीओत पाहू...

आधी पाहू सोमय्यांनी थेट ठाकरे कुटुंबालाच कसं अंगावर घेतलंय. सोमय्यांनी नुकतंच रश्मी ठाकरे यांचं नाव घेत आरोप केले आणि त्यांचे अलिबागमध्ये १९ बंगले असल्याचं सांगितलं. ठाकरे कुटुंबावर झालेला हा सर्वात मोठा आरोप होता. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांना उत्तरही दिलं, सोमय्यांनी पलटवारही केला, पण एपिसोड काही संपला नाही. या प्रकरणानंतर ठाकरे कुटुंबाशी संबंधित थेट दुसरं नाव म्हणजे रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवरच ईडीने टाच आणलीय. पाटणकर यांच्या मालकीच्या कंपनीचे ११ फ्लॅट ईडीने सील केलेत आणि त्याची चौकशीही सुरुय.
ही झाली ठाकरे कुटुंबाशी संबंधित कारवाई.. पण सोमय्या एवढ्यावरच थांबले नाहीत. शिवसेनेतला प्रत्येक नेता त्यांच्या रडारवर असल्याचं चित्र आहे आणि ज्याच्याविरोधात पुरावे दिले जातील त्याच्यावर कारवाई होतेय. याचं ताजं उदाहरण म्हणजे शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर झालेली कारवाई. सोमय्यांनी यशवंत जाधवांनी कसा भ्रष्टाचार केलाय हे जाहीरपणे सांगितलं आणि त्यांनी गेल्या दोन वर्षात खरेदी केलेल्या मालत्तांची यादीच जारी केली. गेल्या दोनच वर्षात यशवंत जाधव आणि त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांनी ३६ इमारती खरेदी केल्याचं सोमय्यांनी म्हटलं.

सोमय्यांच्या आरोपांची आणि ईडीच्या कारवाईची मालिका अत्यंत वेगात सुरूय. सोमय्यांनी थेट ठाकरे कुटुंबाचं टेंशन वाढवणारे आरोप केलेत आणि त्यानुसार कारवाईही केली जातेय. सोमय्या प्रत्येक कारवाईनंतर पुढचा नंबर कुणाचा असेल याचाही इशारा देतायत. ज्या शिवसेनेने सोमय्यांचं लोकसभेचं तिकीट कापायला फडणवीसांना भाग पाडलं, त्याच शिवसेनेविरोधात सोमय्या किती आक्रमक झालेत आणि कसे मैदानात उतरलेत ते दाखवणारी ही कारवाई आहे.

Recommended