मुंबई इंडियन्स मागे हटली पण चेन्नई सुपर किंग्जनं मराठमोठ्या राजवर्धनला दिली संधी

  • 2 years ago
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने महाराष्ट्रातील चाहत्यांना आता एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण चेन्नईने आता ऋतुराज गायकवाड पाठोपाठ दुसरा मराठमोळा खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल करून घेतला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषकात महाराष्ट्राच्या राज्यवर्धन हंगरगेकरने दमदार कामगिरी केली होती. राज्यवर्धनसाठी या लिलावात २० लाख एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. राज्यवर्धनला संघात घेण्यासाठी पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचा संघ पुढे सरसावला होता. मुंबई इंडियन्स राज्यवर्धनला आपल्या संघात घेत असल्याचे पाहत लखनौ सुपरजायंट्सच्या संघाने त्याच्या लिलावात उडी घेतली. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि लखनौच्या संघात चांगलीच जुगलबंदी सुरु झाली. पण त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने राज्यवर्धनसाठी आपले बाहू सरसावले आणि त्याला संघात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले. राज्यवर्धन २० लाखावरून एक कोटीच्या घरात आला तेव्हा मात्र मुंबई इंडियन्सने त्याचा नाद सोडू दिला आणि चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने तब्बल १ कोटी ५० लाख रुपये मोजत त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. भारताने युवा विश्वचषक जिंकला आणि त्यामध्ये राज्यवर्धनचा मोलाचा वाटा होता. कठीण प्रसंगी राज्यवर्धनने संघाला सारवल्याचेही पाहायला मिळाले. त्याचबरोबर या संपूर्ण विश्वचषकात तो लक्षवेधी ठरला होता. राज्यवर्धन हा मूळचा तुळजापूरचा असून तो १९ वर्षांचा आहे.

Recommended