औरंगाबादेत दाखल झालेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं भव्य-दिव्य रुप

  • 2 years ago
छत्रपती शिवाजी महाराजांचा २१ फूट उंच पुतळा औरंगाबाद शहरात दाखल झाला. पुतळा पाहण्यासाठी शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता. पुतळा दाखल होताच सकाळी शिवप्रेमींनी त्याचे पूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील इतर पुतळ्यांपेक्षा हा पुतळा उंच असल्याचे मानले जात आहे.

शहराच्या क्रांती चौकात महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसवला होता. मात्र, या चौकातील उड्डाणपुलामुळे पुतळा झाकला जात होता. तो सहजासहजी दिसत नव्हता, त्यामुळे पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. उड्डाणपुलापेक्षा पुतळ्याची उंची जास्त असावी, असे ठरवण्यात आले. नऊ वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास पालिकेला मुहूर्त मिळत नव्हता. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये महापालिकेप्रती तीव्र नाराजीची व संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून पालिका प्रशासनाने पुतळा उभारणीच्या दृष्टीने गांभीर्याने काम सुरू केले. पुणे येथील दीपक थोपटे या शिल्पकाराला पुतळा तयार करण्याचे काम देण्यात आले. पुतळा कसा असावा, यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आढावा बैठका घेतल्या. सुरुवातीला या पुतळ्याचे मॉडेल तयार करण्यात आले. त्याला पालकमंत्र्यांसह राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाची मान्यता मिळाल्यावर पुतळा तयार करण्याचे काम शिल्पकाराने हाती घेतले. दीड वर्षांनंतर पुतळा तयार झाला. तयार करण्यात आलेला पुतळा सोमवारी (२३ जानेवारी) रात्री साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास औरंगाबादेत दाखल झाला.

Recommended