कोरोना संकटकाळातील पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान-उपमुख्यमंत्री अजित पवार

  • 4 years ago
पुणे | कर्तव्य पार पाडताना माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलीसांप्रति नागरिकांचा आदर वाढला आहे. सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि राज्य पोलिसांच्या कामगिरीचा गौरव केला. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच पुणे शहर पोलीस कर्मचारी बॅच 2012 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट देऊन पोलीसांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी हे गौरवोद्‌गार काढले. लॉकडाऊन कालावधीतील पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीची माहिती देणाऱ्या फलकाची पाहणीही उपमुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या संकटाचा धैर्याने सामना करीत उत्कृष्ट जनसेवा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांच्या कामाचे विशेष कौतुक केले. कर्तव्य बजावत असताना स्वच्छता, सुरक्षिततेची काळजी घ्या. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. सॅनिटायझरचा वापर करा. आदी सूचना त्यांनी केल्या. यावेळी 'फील द बिट' पुस्तिकेचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.